Ad will apear here
Next
तेरे बिना जिंदगी से कोई
‘अष्टपैलू’ हे विशेषणही कमी पडेल, इतके पैलू असलेला अभिनेता संजीव कुमार याचा सहा नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्याच्यावर चित्रित झालेले ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ हे गीत...
...............
लहान असताना एक वाक्प्रचार कानावर आला व त्याची सत्यता मोठेपणी कळली. ‘कमी चारा खाणारी, जास्त दूध देणारी, मारकी नसणारी अशी गाय कधी मिळत नाही,’ हाच तो वाक्प्रचार होता. त्याचा मतलब काय, तो त्या वयात नाही कळला; पण जसजसं वय आणि थिएटरमधील काळोखाचं आणि त्या रूपेरी पडद्याचं आकर्षण वाढत गेलं, त्याप्रमाणे याच पद्धतीचा, पण वेगळ्या उपमा असलेला एक शब्दसमूह डोक्यात आला. तो म्हणजे ‘दिलीपचा हताश नायक, किशोर-मेहमूदची हलकीफुलकी विनोदी मुद्रा, अमिताभचा संतप्त युवक, अनुपम खेरचा ऐन तारुण्यातील वृद्ध असे सारे एका अभिनेत्याच्या जागी कोठे बघायला मिळणार?’ हा प्रश्न मनात उभा राहण्याचा अवकाश आणि एका क्षणात त्याचे उत्तर मिळाले!

आहे! असा एक तरी ‘हरीचा लाल’ नव्हे ‘हरीभाई जरिवाला’ मौजूद आहे. ‘संजीव कुमार’ या सहा अक्षरांना कशाचेही वावडे नाही. तुम्हाला संतप्त, सूडाने पेटलेली व्यक्ती बघायची आहे, तर ‘शोले’ बघा. आठवा तो संवाद ‘गब्बर साप को हाथों से नहीं, पाँवसे कुचला जाता है!’ हताश प्रेमी बघायचा आहे, तर ‘अनामिका’ बघा! हलका फुलका विनोद बघायचा असेल तर ‘अंगूर’, ‘पती पत्नी और वह’, ‘इतनी सी बात’, ‘मौसम’, ‘मनचली’ अशा काही चित्रपटांची यादी आहे. वृद्ध व्यक्ती पाहायची असेल, तर ‘परिचय’, ‘त्रिशूल’, ‘आँधी’ हे चित्रपट पाहता येतील.

अशी ही विविध रूपे संजीव कुमारने त्याच्या ऐन तारुण्यात साकार केली आहेत. संजीव कुमार अष्टपैलू अभिनेता होता, हे विशेषण त्याच्यासाठी अपुरे ठरेल. कारण ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात नऊ रसांचे आविष्कार दाखवणाऱ्या नऊ भूमिका लाजवाब अभिनयाने साकार करून त्याने ‘अष्टपैलू अभिनय’ ही पायरी ओलांडली होती.

वाडियांचा ‘निशान’ हा संजीव कुमारचा पहिला चित्रपट! त्यामध्ये तो नायक होता. त्यापूर्वी त्याने ‘हम हिंदुस्थानी’ आणि ‘आओ प्यार करे’ या चित्रपटात लहानसहान भूमिका केल्या होत्या व त्याच वेळी तो रंगभूमीवरदेखील वावरत होता. चरित्र अभिनेते ए. के. हंगल हे त्याचे रंगभूमीवरचे गुरू! ‘निशान’ हा सी दर्जाचा पोषाखी चित्रपट होता. तो प्रदर्शित होताच त्याला त्याच प्रकारच्या ‘अलीबाबा और चालीस चोर’ या चित्रपटातही भूमिका मिळाली. आणि या प्रकारच्या चित्रपटातून बाहेर पडण्यासाठी ‘क्लास’ चित्रपटात दुय्यम भूमिकाही तो स्वीकारू लागला. त्यामध्येच ‘संघर्ष’मधील दुय्यम भूमिका त्याच्या वाट्याला आली आणि तेथूनच त्याच्या उत्तमोत्तम चित्रपटातील उत्तमोत्तम अभिनयाची मालिका सुरू झाली. अभिनयाचे आविष्कार सुरू झाले. मातब्बर नायकांच्या पुढे उभे राहून स्वतःची क्षमता तो सिद्ध करून दाखवत गेला. यामधून काय घडले?

अभिनयाचा सर्वोच्च भारत पुरस्कार १९८५पर्यंत दिलीप-राज-देव, शम्मी, अमिताभ, राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र यांपैकी कोणालाही एकदाही मिळाला नव्हता; पण संजीव कुमारला मात्र वीस वर्षांच्या त्याच्या रूपेरी कारकिर्दीत तो दोनदा मिळाला. तसेच एका बाजूला दस्तक, अनुभव, कोशिश, मौसम यांसारख्या कलात्मक चित्रपटात भूमिका करत असताना जी तन्मयता तो दाखवत होता, तीच तन्मयता त्याने ‘राजा और रंक’, ‘चंदा और बिजली’, ‘लेडिज टेलर’, ‘चेहरे पे चेहरा’ यांसारख्या कमर्शियल चित्रपटात काम करतानादेखील त्याने दाखवली.

१९७८मध्ये अमिताभ बच्चनचा जमाना असताना संजीव कुमारचे आठ चित्रपट आले व त्यातील चार चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. आणि असे कर्तृत्व असतानाच अचानक सहा नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराने त्याला या जगातून जावे लागले. ते मृत्यूचे वय नव्हते; पण अनेकविध पैलू असलेल्या भूमिका मागे ठेवून संजीव कुमार या जगातून गेला! त्याच्या पश्चात चित्रपटसृष्टी चालूच आहे. तसे प्रत्येकाच्या पश्चात हे जग चालूच राहते; पण संजीव कुमारची उणीव जाणवते. गुलज़ार यांचे शब्द आणि त्याच्यावरच चित्रित केलेल्या या गीतामधून त्याला श्रद्धांजली वाहावीशी वाटते....

तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं

(प्रिये) तुझ्याशिवाय असणाऱ्या या जीवनाबद्दल (परमेश्वराकडेच काय पण कोणापाशीही) काही तक्रार नाही. (पण खरे सांगू का?) तुझ्याशिवाय जीवन जगणे खरे जगणे आहे का?

काश ऐसा हो, तेरे कदमों से चुनके मंज़िल चले, 
और कहीं दूर कहीं, तेरेही आगे मंज़िलों की कमी तो नही

तुझ्या पावलांच्या साह्याने (म्हणजेच तुझ्यासह) एखादे ईप्सित, ध्येय आम्ही गाठले असते आणि दूरवर कोठे गेलो असतो (तर किती चांगले झाले असते) तू साथ देण्यास असावीस (अशा वेळी) ध्येयांची काय कमतरता? (पण हाय रे दुर्दैवा. ते माझ्या नशिबात नव्हते.)

जी में आता है तेरे दामनमें सिर छुपा के
हम रोते रहें, रोते रहें,
तेरी भी आँखों मे आसुओं की 
नमीं तो नहीं

(तुझ्या साथीशिवाय जीवन व्यतीत करताना दुःखाने त्रस्त झालेल्या माझ्या मनात कधी असा विचार येतो, की) तुझ्या (प्रेमाच्या) पदरात तोंड लपवून रात्रभर अश्रू ढाळावेत (आणि मनातील दुःखाला वाट करून द्यावी); पण (मी बघतो तर) तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा ओलावाही (नमीं) नसतो. (हे माझे केवढे दुर्दैव आहे.)

आपल्या एकेकाळच्या प्रेयसीचे हे विचार ऐकल्यावर ‘तो’पण ‘तेरे बिना जिंदगी से’चे ध्रुवपद आठवत सांगतो. 

तुम जो कह दो तो, आज की रात चांद डूबेगा नहीं 
रात को रोक लो 
रात की बात है और जिंदगी बाकी तो नही

(हे प्रिये, तू अशी व्याकुळतेने साद घालत असशील, तर मी) तू म्हणत असशील तर या रात्रीला येथेच थांबवतो आणि त्यामुळे हा चंद्रही अस्ताला जाणार नाही. (कारण आता फक्त) ही आजच्या रात्रीचीच गोष्ट आहे (अर्थात फक्त आजची रात्रच आपल्याकडे आहे) (आपले) आता जीवन बाकी राहिले आहे कुठे?

गीतकार गुलज़ार यांनी हे काव्य कोणत्या मनःस्थितीत लिहिले असेल, हे तेच जाणत असतील; पण त्याचा उपयोग ‘आँधी’ चित्रपटात योग्य तऱ्हेने करून घेतला आहे. तारुण्य संपून वृद्धत्वाच्या अवस्थेत भेटलेले नायक-नायिका-संजीव कुमार आणि सुचित्रा सेन! त्यांना ‘जिंदगी बाकी तो नहीं’ ही ओळ यथार्थपणे शोभते.

अन्य चित्रपटात वाद्यांचा गदारोळ उठवणारा संगीतकार आर. डी. बर्मन येथे गुलजार यांच्या चित्रपटात दृष्ट लागण्यासारखी सुंदर चाल व संयमित वाद्यमेळ देऊन गाण्याचा आशय गडद करतो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व किशोर कुमार यांचे स्वर ते काव्य आपल्या मनाला भिडवतात.

आणि हे काव्य पडद्यावर साकार करणारा संजीव कुमार व सुचित्रा सेन यांचा अभिनय, गाण्याचे ‘टेकिंग’... सारे सारेच प्रभावी व न विसरता येण्याजोगे! फक्त प्रभावी संवाद मिळाल्यावरच संजीव कुमार प्रभाव पाडत होता असे नव्हे, तर गीत पडद्यावर साकार करतानाचा त्या गीताच्या आशयाप्रमाणे असलेला त्याचा अभिनयही लाजवाब असायचा! या गीतातही त्याचा एक संवाद आहे तो गीताची गोडी आणखी वाढवतो! संजीवच्या सोनेरी स्मृतीसाठी हे ‘सुनहरे’ गीत! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZWDWCS
Similar Posts
तुम ही मेरे मंदिर... गीतकार राजेंद्रकृष्ण यांचा २३ सप्टेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘तुम ही मेरे मंदिर, तुम ही मेरी पूजा’ हे गीत...
दिल पुकारे आ, रे, आ, रे....! एक ऑक्टोबर हा संगीतकार एस. डी. बर्मन आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या या जोडीचे ‘दिल पुकारे आ, रे, आ, रे....!’ या गीताबद्दल...
आ नीले गगन तले... गीतकार हसरत जयपुरी यांचा आज (१७ सप्टेंबर) स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘आ नीले गगन तले’ हे गीत...
‘हम तेरे प्यार में...’ एक ऑगस्ट हा अभिनेत्री मीनाकुमारी हिचा जन्मदिवस. त्या निमित्ताने, तिच्यावर चित्रित झालेल्या आणि तिच्या अप्रतिम अभिनयाचा दाखला असलेल्या ‘हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है’ या गीताचा रसास्वाद... आजच्या ‘सुनहरे गीत’मध्ये....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language